भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन

उपस्थित मान्यवर, तसेच बंधु भगिनींनो, भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या भारत देशाला असंख्य शूरवीरांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाले. जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशासाठी घटनाकारांच्या दुरदृष्टीतून राज्यघटना निर्माण झाली आणि ती दि.26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. या संविधानामुळे देश एक सुदृढ गणराज्य बनला आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वात भारत देश प्रगतीच्या प्रत्येक क्षेत्रात झेप घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गतिमान विकासाची कास धरून महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकावरचे स्थान अधिक दृढ केले आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सर्वात आघाडीवर आहे. आता स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 37 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यातून महाराष्ट्रात 43 लक्ष इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच आतापर्यंत सव्वा लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 1 हजार 409 कोटीचे खरीप पिककर्ज वाटप झाले आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत गतवर्षी 177.17 कोटी इतकी नुकसानभरपाई शेतक-यांना वितरित करण्यात आली. यंदा खरीप हंगामात 3 लाख 58 हजार 513 पीक विमा, रब्बी हंगामात 31 हजार 933 शेतकरी विमा योजनेत सहभागी आहेत. जिल्‍हयात जून ते ऑक्‍टोंबर 2025 याकालावधीत नैसर्गिक आपत्‍तीने 18 व्‍यक्‍तींचा मृत्‍यु झाला असुन 4 लक्ष याप्रमाणे मृत व्‍यक्‍तीच्‍या वारसांना 72 लक्ष इतका निधी वितरीत करण्‍यात आलेला आहे. तसेच मान्‍सुन 2025 मध्‍ये अतिवृष्‍टी व पुरामुळे जिल्‍हयात 6 लक्ष 64 हजार हेक्‍टर आर शेती पिकांचे नुकसान झाले असुन आतापर्यंत 4 लक्ष 66 हजार बाधीत शेतकरी यांना 428 कोटी रूपये वितरीत करण्‍यात आलेले आहे. तसेच खते व बियांणे याकरीता 4 लक्ष शेतकरी यांना 498 कोटी रूपये असा एकुण 927 कोटी पेक्षा जास्‍त निधी नैसर्गिक आपत्‍तीने बाधीत शेतकरी यांना वितरीत करण्‍यात आलेले आहे. तसेच मदतीपासुन एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची ग्वाही मी यानिमित्त देतो. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत देशात 100 आकांक्षित कृषी जिल्ह्यात यवतमाळचा समावेश झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पादकता वाढविण्यासोबतच शाश्वत कृषी पद्धतीला चालना मिळणार आहे. ‘पोकरा’मध्ये जिल्ह्यातील 559 गावांची निवड झाली असून, वैयक्तिक लाभार्थ्यांना 22 घटकांसाठी लाभ मिळणार आहे. नागरिकांच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब शासकीय निर्णयात व कारभारात असावे, असा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. नागरिकांच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार प्रतिसाद प्रणाली निर्माण करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि ‘एआय’चा योग्य वापर करून अनेक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेऊन कारभारात अद्ययावत तंत्रज्ञान व एआयचा वापर केला आहे. सेवोत्तम पोर्टलद्वारे नागरिकांना जलद व दर्जेदार सेवा मिळत आहे. ‘कृषी महामार्ग’ उपक्रमाद्वारे गावनकाशे डिजीटाईझ होऊन शेतरस्त्यांबाबत विश्वसनीय दस्तऐवज निर्माण होत आहे. त्यामुळे शेतरस्त्यांचे वाद कमी होणार आहेत. ‘मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सिलेन्स’ द्वारे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात येत आहे. विविध योजनांची इत्थंभूत माहिती देणारे ‘ई- मित्र चॅटबोट’ या उपक्रमाचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ होत आहे. ‘डिजीटल करसंकलन प्रणाली’चा महसूल संकलनासाठी उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे, ‘प्रोजेक्ट सँडमॅप’द्वारे वाळूघाटांची अचूक माहिती मिळून महसूलवाढीला मदत होणार आहे.‘शासन आपल्या मोबाईलवर’ ही नागरिकांना प्रतिसाद देणारी यु-ट्युब वाहिनी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शेतकरी आत्महत्या प्रतिबंध, तसेच संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी ‘मिशन उभारी’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत शासकीय योजना व स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत 700 कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. हा केवळ शासकीय उपक्रम नाही, तर अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मानसिक, सामाजिक व आर्थिक आधार देणारी ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. 'डिजिटल सेवा' आणि 'लोककल्याण' या त्रिसूत्रीवर आमचे प्रशासन वेगाने काम करत आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की, गेल्या वर्षी १ मे २०२५ रोजी माझ्या हस्ते ज्या 'योजना पोर्टल प्रणालीचे लोकार्पण झाले होते, त्या प्रणालीने आज मोठे यश संपादन केले आहे. आजवर सुमारे सव्वा लाख नागरिकांनी या पोर्टलला भेट दिली असून, विविध योजनांसाठी २७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ३ हजार ४५५ लाभार्थ्यांची निवड पूर्णपणे डिजिटल स्वरूपात करून त्यांना आदेशांचे वाटपही करण्यात आले आहे. यामुळे सामान्य माणसाचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचले आहेत. या यशाबद्दल मी जिल्हा परिषद प्रशासनाचे मनापासून अभिनंदन करतो. आरोग्य क्षेत्रात आपण गुणवत्तेचा नवा मापदंड प्रस्थापित करत आहोत. 'क्वालिटी' कार्यक्रमांतर्गत २०२५ मध्ये आपली कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बेलुरा आणि तळेगाव यांचे राष्ट्रीय स्तरावर नामांकन झाले आहे. तसेच पांढरकवडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अर्ली या केंद्राची NQAS अंतिम तपासणी पूर्ण झाली असून, दिग्रस तालुक्यातील विटाळा उपकेंद्राची देखील या मानांकनासाठी निवड झाली आहे. माता-बाल मृत्यूदर कमी करण्यासाठीच्या 'लक्ष्य' (Laqkshya) कार्यक्रमांतर्गत अर्णी ग्रामीण रुग्णालय आणि पुसद उपजिल्हा रुग्णालयाची निवड झाली आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आगामी काळातही अशाच प्रकारचे प्रयत्न करण्याचे निर्देश मी जिल्हा प्रशासनाला देतो. १७ सप्टेंबर २०२५ पासून आपण जिल्ह्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबवत आहोत. सुशासन, जलसमृद्धी, आणि मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी यांसारख्या ८ मुद्द्यांवर आधारित हे अभियान जिल्ह्यातील १२४१ ग्रामपंचायतींमध्ये सुरू आहे. "माझे आवाहन आहे की, सर्व ग्रामपंचायतींनी यात हिरहिरीने भाग घेऊन यवतमाळ जिल्ह्याचा नावलौकिक राज्यस्तरावर उंचावावा. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा आपण तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर पुरस्कार देवून गौरव करणार आहोत." बंजारा बांधवांसाठी 'संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना' ही एक क्रांती ठरत आहे. या अंतर्गत आपण जिल्हयातील ३६ तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिला आहे, तसेच ३२ तांड्यांना महसुली दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे तांडा वस्तीतील विकास प्रक्रियेला नवी गती मिळणार आहे. तसेच, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (MSRLM) महिला सक्षमीकरणाचे मोठे उद्दिष्ट आपण गाठले आहे. या वर्षात २,२१,५७६ महिलांचे उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक करण्याचे आमचे ध्येय होते, त्यापैकी १,९५,७५६ महिलांना आपण 'लखपती दीदी' बनवण्यात यश मिळवले आहे. मुख्यमंत्री महोदयांचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने हे आमचे मोठे पाऊल आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासोबतच आपल्या सर्व नगर परिषद प्रशासनानेही केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याबद्दल मी सर्व मुख्याधिकारी आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन करतो. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : 'प्रत्येकाला हक्काचे घर' हे स्वप्न साकार करताना जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ११७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित १ हजार १२८ घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. अनुदान वितरण आणि लाभार्थ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन या दोन्ही पातळ्यांवर नगर परिषदांनी अत्यंत संवेदनशीलतेने काम केले आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM SVANidhi) : शहरातील छोट्या व्यावसायिकांना आणि पदपथ विक्रेत्यांना आर्थिक आधार उपलब्ध करून देणारी ही योजना एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करताना आपण जिल्ह्यात एकूण १६ हजार ६३२ पेक्षा जास्त बांधवांना या योजनेचा लाभ दिला आहे. यामध्ये १२ हजार २३२ व्यावसायिकांना १० हजार रुपयांचा प्रथम हप्ता प्रदान करण्यात आला. ५८० जणांना २० हजार रुपयांचा द्वितीय हप्ता देण्यात आला. तर ७५० लाभार्थ्यांनी ५० हजार रुपयांच्या तिसऱ्या हप्त्याचा लाभ घेत आपला व्यवसाय विस्तारला आहे. डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि पारदर्शक कारभारामुळे आपल्या जिल्ह्यातील नगर परिषदा 'स्मार्ट आणि गतिमान' प्रशासनाचे उत्तम उदाहरण सादर करत आहेत. प्रशासकीय पारदर्शकता आणि लोककल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज शिबिर महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात महसूल विभागाच्या वतीने एकूण ३४८ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४९ हजार ५७३ लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पांदण रस्ते मोकळे असणे अत्यंत आवश्यक आहे. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत जिल्ह्यात २६३ पांदण रस्ते अतिक्रमित होते. मला सांगताना आनंद होतो की, महसूल प्रशासनाने अत्यंत तत्परतेने कारवाई करत यातील २५१ रस्ते अतिक्रमणमुक्त केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. जिल्ह्यात आपण 'कृषी महामार्ग' हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवत आहोत. याअंतर्गत जे शेत पांदण रस्ते मूळ गाव नकाशावर उपलब्ध नव्हते, ते आता नकाशावर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ८ गावांमधील नकाशे अद्ययावत करण्यात आले असून, मार्च २०२६ अखेर जिल्ह्यातील सर्व गाव नकाशे अद्ययावत करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यामुळे जमिनीचे वाद कमी होऊन शेतकऱ्यांना शाश्वत रस्ते उपलब्ध होतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे आपला जिल्हा जसा थेट मुंबईशी जोडला गेला आहे आणि विकासाची नवी दारे उघडली आहेत, त्याच धर्तीवर 'महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग' (पवनार ते पत्रादेवी) हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. समृद्धी महामार्गाने आपल्याला राज्याची राजधानी मुंबई जवळ केली, तर हा नवीन शक्तीपीठ महामार्ग यवतमाळला थेट विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाशी जोडणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात या महामार्गाची लांबी १३६.७५ कि.मी. असून, तो कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णी, महागाव आणि उमरखेड या ६ तालुक्यांतील 72 गावांमधून जाणार आहे. या महामार्गासाठी जिल्हयातील 72 पैकी 61 गावांमधील संयुक्त मोजणीची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. मोजणी पूर्ण झालेल्या ४८ गावांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गामुळे मालवाहतूक आणि उद्योगांना चालना मिळत आहे, त्याच धर्तीवर शक्तीपीठ महामार्गामुळे आपल्या जिल्ह्यातील शेतमाल आणि उत्पादने बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे अधिक सुलभ होईल. यामुळे कृषी आधारित उद्योगांना आणि पर्यटनाला मोठी उभारी मिळेल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ रस्तेच नव्हे, तर रेल्वे कनेक्टिव्हिटी असणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यवतमाळ जिल्ह्याचा बहुप्रतिक्षित असा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग आता लवकरच पुर्ण होणार आहे. हा रेल्वे मार्ग एकूण १८४ किलोमीटर लांबीचा असून, त्याचे काम सध्या गतीने सुरू आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि कृषी विकासाला एक नवी गती मिळेल, असा मला ठाम विश्वास आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यात एकूण २७०.९२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १०७.८० हेक्टर क्षेत्राचे संपादन यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. उर्वरित ५५.३२ हेक्टर क्षेत्राचे संपादन देखील आपण लवकरच पूर्ण करत आहोत. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात 15 शेतकरी उत्पादक कंपन्यांना मान्यता देण्यात आली असून, 12 कंपन्यांना 9 कोटी 26 लक्ष रू. निधी वितरित केला आहे. त्यांची गोदाम बांधकाम, मशिनरी, शेड अशी कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ग्रामीण मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, 4 कोटी निधीतून हर्षी (पुसद), चिंचगाव (नेर), सावर (बाभुळगाव) येथे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नव्या इमारती निर्माण होत आहेत. खनिज विकास निधीतून पांढरकवडा, वणी, झरीजामणी व मारेगाव तालुक्यातील शेतक-यांसाठी 4 कोटी 38 लक्ष रू. निधीतून सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र देण्यात आले आहे. खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील मॅाडेल स्कूल, डिजीटल स्कूल, पोर्टेबल कंटेनर अभ्यासिका, जि. प. शाळांतील डेस्क, बेंच, कुंपण भिंती, स्मार्ट क्लासरूम अशा कामांसाठी 94.25 कोटी रू. निधी मंजूर केला आहे. 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत सुविधा उभारत आहोत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात 44 कोटी 72 लक्ष रू. निधीतून वॉर्ड सुधारणाबरोबरच अत्याधुनिक सामग्री देण्यात येत आहे. पांढरकवडा, पुसद येथील उपजिल्हा रूग्णालय व वणीचे ग्रामीण रूग्णालयात स्मार्ट सुधारणांसाठी 30 कोटी रू. निधी मंजूर केला आहे. पुसद येथील रूग्णालयाची श्रेणीवाढ केल्याने तिथे 100 खाटांचे रूग्णालय व राळेगाव तालुक्यातील वडकी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभे राहत आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत 11 लाख 95 हजार 334 लाभार्थ्यांनी योजनेचे गोल्डन कार्ड काढले आहे. या योजनेचा जिल्ह्यात 97 हजार 876 रूग्णांनी लाभ घेतला. आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यावर आमचा भर आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे ‘ऑपरेशन प्रस्थान’ हाती घेऊन 8 हजार 252 विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले. सायबर सुरक्षितता, नवे कायदे याविषयी मार्गदर्शन दिले जात आहे. महिलाभगिनींसाठी ‘माविम’तर्फे जिल्ह्यात 6 हजार 876 महिला बचत स्थापण्यात आले असून, त्यात 76 हजार 964 सभासद आहेत. त्याद्वारे 22 हजार 563 महिलांना व्यवसाय-उद्योगासाठी मदत झाली आहे. प्रत्येक तालुक्यात महिलांना ड्रोनसखी प्रशिक्षण देऊन, ड्रोनद्वारे शेतफवारणीची सुविधा देण्यात येत आहे. गेल्या वर्षात रोजगार हमी योजनेत 2 लक्ष 84 हजार 889 हजार व्यक्तींना रोजगार मिळाला व 41 हजार 644 कामे पूर्ण झाली. यंदाही 58 हजार 703 कामे हाती घेण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या कामांसाठी ४ हजार ७७५ कोटी निधीला कॅबिनेट बैठकीत नुकतीच मंजुरी मिळाली. त्यामुळे नेर, बाभुळगाव, कळंब, राळेगाव व मारेगाव या पाच तालुक्यामधील एकूण ५८ हजार ७६८ हेक्टर लागवडीलायक क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व १६ पंचायत समित्यांमध्ये नागरिकांसाठी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच धर्तीवर जिल्हा रुग्णालय आणि प्रमुख बसस्थानकांवरही ही सुविधा देण्यास आपण मंजुरी दिली आहे. तसेच, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष-किरणशास्त्र विभागासाठी अत्याधुनिक १२८ स्लाईस सीटी स्कॅन (CT Scan) मशीन उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे गोरगरीब रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणीच मोठी उपचार सुविधा मिळेल. आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करताना लोणी (आर्णी), मुकुटबन (झरी), फुलसावंगी (महागाव), मांगकिन्ही आणि बोरी अरब (दारव्हा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मुख्य इमारतींसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे बांधकाम आपण पूर्ण केले आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सुमारे २०० शाळांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेतील निकाल सुधारावा यासाठी आपण मोबाईल अॅपद्वारे आधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण केली आहे. तसेच, तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ६० तांड्यांमध्ये अत्याधुनिक वाचनालयांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे, जेणेकरून तांड्यातील मुले स्पर्धा परीक्षेत मागे राहणार नाहीत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाला ५० नवीन अत्याधुनिक वाहने (स्कॉर्पिओ आणि बोलेरो) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व तालुक्यांतील मुख्य चौकात CCTV यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच, अवधूतवाडी आणि दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे बांधकाम पूर्ण करून आपण पोलीस प्रशासनाला अधिक सक्षम केले आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या आणि पर्यायाने विदर्भाच्या सिंचन क्षेत्राचा कायापालट करणारा 'निम्न पैनगंगा आंतरराज्यीय प्रकल्प' हा आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. घाटंजी तालुक्यातील हा प्रकल्प केवळ पाणीपुरवठ्याचे साधन नसून या भागातील विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद अशा दोन राज्यांमधील सुमारे १,६०,०५० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता तर २,३५,२७५ हेक्टर इतकी अफाट आहे. हा प्रकल्प आंतरराज्यीय असून याची सिंचन क्षमता २ लाख हेक्टरपेक्षा जास्त असल्यामुळे तो राष्ट्रीय प्रकल्पाचे सर्व निकष पूर्ण करतो. महाराष्ट्र (८८%) आणि तेलंगणा (१२%) या दोन्ही राज्यांमध्ये पाणीवापर आणि खर्चाबाबत पूर्ण सहमती झाली आहे. प्रकल्पाची व्याप्ती मोठी असल्याने आपण त्याचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करणार आहोत. पहिल्या टप्प्यात २०३० पर्यंत धरण बांधकाम पूर्ण करून सुमारे ५८,९७२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १३ गावांचे पुनर्वसन आणि ७,१७१ हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, भूसंपादनासाठी वाढीव निधीची मागणीही आपण शासनाकडे लावून धरली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर केवळ शेतीलाच पाणी मिळणार नाही, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, औद्योगिकीकरण वाढेल आणि मत्स्यव्यवसाय, पर्यटन व दळणवळणाला मोठी चालना मिळेल. विशेषतः आत्महत्याग्रस्त आणि मागास भागातील शेतकरी बांधवांच्या जीवनात यामुळे नंदनवन फुलेल. शासन-प्रशासनाबरोबरच समाजातील संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या सहकार्याने विकासप्रक्रिया पुढे जात आहे. जिल्ह्यात केवळ सरकारी यंत्रणाच नाही, तर अनेक सेवाभावी संस्था आणि व्यक्ती स्वयंस्फूर्तीने माणुसकीची ज्योत तेवत ठेवत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या जिल्ह्यातील 'नंददीप फाऊंडेशन'. निराधार, बेघर आणि विशेषतः ज्यांच्याकडे कोणीही पाहत नाही अशा मानसिक रुग्णांना आधार देण्याचे, त्यांच्यावर उपचार करण्याचे आणि त्यांना हक्काचा निवारा देण्याचे कार्य हे फाऊंडेशन करत आहे. या फाऊंडेशनचे संस्थापक संदीप शिंदे यांच्या कार्याची दखल आता सातासमुद्रापार घेतली गेली आहे. अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा हाँगकाँगमधील 'द वन ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ही आपल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तसेच, त्यांना मिळालेला 'जिजामाता विद्वत गौरव' हा त्यांच्यातील सेवावृत्तीचा आणि अभ्यासू वृत्तीचा सन्मान आहे. अशा निस्पृह सेवाभावी लोकांमुळेच आपल्या जिल्ह्याचे नाव आज जागतिक स्तरावर चमकत आहे." त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. सर्वांच्या साथीने विकासाचा हा प्रवाह असाच पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे ‘विकसित भारत 2047’ चे स्वप्न निश्चित पूर्ण होईल यात शंका नाही. उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद ! !! जय हिंद !! जय महाराष्ट्र !!

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस