स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे.
‘माझे गाव, माझी जबाबदारी’
मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांबाबत ग्रामपंचायत कर्मचारी, पंचायत सचिव व प्रमुख समन्वयकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात येईल. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या संकल्पनेअंतर्गत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सामाजिक माध्यमांवर व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
वन टाईम युज प्लास्टिकला नकार
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रभातफेरी, शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा, महिला बचत गट संवाद, स्वच्छता मोहिम तसेच ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘मिशन लाईफ’ अंतर्गत पाणी बचत, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा निर्मिती कमी करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून चर्चा
५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रामसभांमध्ये मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६, कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे. मोहिमेदरम्यान राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फोटो व व्हिडिओ एसबीएम-जी एमआयएस पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.
स्वतःच्या कुटुंबापासून प्रारंभ करा
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ‘स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायतींनी गावनिहाय कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. पर्यावरण संरक्षणाची ही चळवळ स्वतःच्या कुटुंबापासून सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Comments
Post a Comment