‘सुपर ५०’ साठी गुरुवारी परीक्षा
२०६२ विद्यार्थी ; १० परीक्षा केंद्र
ऑफलाईन पद्धतीने होणार परीक्षा
जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना जेईई आणि एनईईटी (नीट) परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सुपर ५०’ उपक्रमांतर्गत २०६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांची निवड परीक्षा गुरुवारी दि. २५ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेतच घेतली जाणार आहे.
या परिक्षेसाठी जिल्ह्यात १० परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून त्यानुसार यवतमाळ येथे ४ व पुसद, उमरखेड, दारव्हा, वणी, राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी प्रत्येकी एक अशा १० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. त्यामध्ये यवतमाळ येथील रमाबाई आंबेडकर विद्यालय, विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय आणि जि. प. माध्यमिक शाळा गोधणी रोड हे परीक्षा केंद्र आहेत. तर पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालय, उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, दारव्हा येथील न.प शाळा क्र. २, वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय, राळेगाव येथील न्यु इंग्लिश हायस्कूल, पांढरकवडा येथील जि.प माध्यमिक शाळा येथे ही परीक्षा घेतली जाणार आहे.
२०६२ विद्यार्थी देणार परीक्षा
‘सुपर ५०’ परीक्षेसाठी जिल्ह्यातील २०६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानुसार यवतमाळ मधील चार परीक्षा केंद्रावर ७७२ विद्यार्थी, पुसद ३६०, उमरखेड २९३, दारव्हा २१७, वणी ११४, राळेगाव ९७ आणि पांढरकवडा येथे २०९ असे एकूण २०६२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
रोल नंबर, परीक्षा केंद्राची माहिती मोबाईलवर
ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षार्थी क्रमांक (रोल नंबर), परीक्षा केंद्राची माहिती विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आली आहे. तसेच ही माहिती गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालय, परीक्षा केंद्र तसेच गुगल ड्राईव्हद्वारे ॲानलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत काही अडचणी असल्यास गटशिक्षणाधिकारी यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या सूचना
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ११:३० वाजेपर्यंत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर येतांना विद्यार्थ्यांनी आपली ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, इयत्ता १० वी एसएससी बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट सोबत आणणे आवश्यक आहे. ओळखपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचा वापर करणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांना मनाई
ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर, ब्लूटूथ डिव्हाइस, इअरफोन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यास सक्त मनाई आहे. तसेच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, कॉपी करणे, इतर विद्यार्थ्यांशी बोलणे किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास विद्यार्थ्याचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
परीक्षा केंद्रातील सर्व सूचना व पर्यवेक्षकांच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रातील शिस्त व स्वच्छता राखण्यास सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
निवड होणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना नामांकित संस्थेत प्रशिक्षण
या ‘‘सुपर 50’ उपक्रमाच्या परीक्षेत निवड होणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना नागपूर, नांदेड आणि अकोला येथील नामांकित संस्थेत जेईई आणि एनईईटी (नीट) परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांचे शिक्षण शुल्क, निवास, भोजन आणि अभ्यास साहित्याचा संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जाणार आहे.
“यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यामध्ये भविष्य घडविण्याची क्षमता आहे. ‘सुपर ५०’ हा केवळ उपक्रम नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचा प्रयत्न आहे. या परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करावेत. तुमचे यश हेच यवतमाळ जिल्ह्याचे यश असेल."
— विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ
Comments
Post a Comment