पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांना ईसापूर धरणाचे पाणी जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश

 पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना  नागरिकांना मोठा दिलासा उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून आरक्षित पिण्याच्या पाण्यापैकी ३ दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती उमरखेड यांनी पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटल्याने गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ग्रामस्थ व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरक्षित पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली होती. त्यानुसार उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणात सध्या ४२३.३२४५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, यापूर्वी ९ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. आता अतिरिक्त ३ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडून नदीकाठावरील गावांतील नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निर्माण होणार आहे.
या निर्णयामुळे उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील ४४ गावांतील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती