मारेगाव तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन उत्साहात

राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4 कोटी 5 लाख रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आज मारेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मौजा टाकरखेडा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ येथील भूसंपादन क्र. 34, क्षेत्र 2.00 हेक्टर शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारेगावचे तहसीलदार मा. श्री नीलवडे, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री अनिल पाटील देरकर, नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्के, गटविकास अधिकारी वनखंडे, तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुस्कार, माजी नगराध्यक्ष इंदुताई किन्हेकर तसेच पुरुषोत्तमजी बुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तालुक्यातील खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रगती करण्यासाठी या संकुलामुळे मोठी संधी उपलब्ध होणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी हे संकुल उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुस्कार यांनी केले. कार्यक्रमास नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित नागरिक, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गौरकार यांनी केले, तर आभार प्रदर्शन धनराज ठेपाले यांनी केले. तालुक्यातील क्रीडा विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

Comments