मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची संधी !
अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित १५ ते २२ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेमार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी हा कार्यक्रम रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास आणि समाजोपयोगी कार्याची मोठी संधी उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी प्रशिक्षित समुपदेशक तयार करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेला मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या प्रशिक्षणाचा दीर्घ अनुभव आहे. या अनुभवाच्या आधारे प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, प्रशिक्षण पद्धती, पर्यवेक्षण आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी एमआयएमएचमार्फत पार पाडण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये काय शिकविले जाणार
अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विद्यार्थी समुपदेशनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये व सक्रिय श्रवण, तणाव व्यवस्थापन व भावनिक स्वास्थ्य, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध व संकट व्यवस्थापन, सायबर सुरक्षा व डिजिटल आरोग्य, पालक व शिक्षकांसोबत समन्वय, मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन तसेच शाळा आधारित समुपदेशन व रेफरल प्रणाली या विषयांचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कौशल्य विकासावर विशेष भर
या प्रशिक्षणामध्ये केवळ सैद्धांतिक ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष समुपदेशन कौशल्ये विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींना केस स्टडी, रोल प्ले, सुपरव्हिजन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि क्षेत्रीय अनुभवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये व्यावसायिक समुपदेशक म्हणून आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षणाचे स्वरूप
प्रशिक्षणाचे स्वरूप हायब्रीड म्हणजेच ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून राबविण्यात येणार आहे. सहा महिन्यांच्या या कार्यक्रमामध्ये १५ दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाइन तज्ज्ञ सत्रे, केस चर्चा तसेच सहा महिन्यांचे मार्गदर्शन आणि सुपरव्हिजन यांचा समावेश असेल. त्यामुळे विद्यार्थी, कार्यरत व्यावसायिक आणि इतर इच्छुक उमेदवारांनाही या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे सुलभ होणार आहे.
प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या संधी
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामध्ये शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, मानसमित्र समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, पालक व शिक्षक कार्यशाळा समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच स्वतंत्र समुपदेशन सेवा सुरू करून स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेता येणार आहे.
किती जणांना मिळणार संधी
प्रत्येक जिल्ह्यातील गरज, विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक बॅचमध्ये किमान २० ते कमाल ३० उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.
पात्रता निकष
एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क ही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. यासोबतच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार असल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक राहील. यामध्ये अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा पुरावा यांचा समावेश असेल.
प्रशिक्षण स्थळ आणि निवासी व्यवस्था
सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास आणि भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे.
मोफत प्रशिक्षणाची संधी
अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांसाठी या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे.
प्रमाणपत्राचे फायदे
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘अमृत मानसमित्र समुपदेशक’ हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारे शाळा व महाविद्यालयांमध्ये समुपदेशक म्हणून संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच अमृत मानसमित्र उपक्रमाशी संलग्न होण्याची, मानसिक आरोग्य व जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याची आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची संधीही प्राप्त होऊ शकते.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांना अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. https://mahaamrut.org.in अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.
अर्जाची मुदत
अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना ई-मेल किंवा संदेशाद्वारे माहिती दिली जाईल. निर्धारित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांच्या जागी प्रतीक्षा यादीतील इतर पात्र उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी
या योजनेविषयी अधिक माहिती, मार्गदर्शन किंवा इतर तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी संबंधित जिल्ह्यातील अमृतच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment