झाशीची राणी अंतरगाव गटाची विषमुक्त शेतीकडे वाटचाल
पाणी फाउंडेशन, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात विविध गटांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील झाशीची राणी तुर उत्पादक शेतकरी गटाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
गटाच्या निमंत्रक कोमलताई राजेंद्र बेलखेडे यांनी १७ महिलांना एकत्र आणून गटाची स्थापना केली असून सर्व महिलांनी मिळून कमी खर्चात, शास्त्रीय व एकात्मिक पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला आहे. गटामार्फत बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया तसेच सरी-वरंबा पद्धतीने पेरणी यांसारख्या उपक्रमांची संयुक्तपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गटातील महिलांनी एकत्र येऊन २०० लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. सेंद्रिय शेतीमध्ये अत्यंत प्रभावी मानला जाणारा हा नैसर्गिक कीटकनाशक तयार करण्यासाठी करंज, कडुलिंब, निरगुडी, घाणेरी, रुई, कन्हेरी, एरंड, सीताफळ, पपई, धोत्रा व गुळवेल यांसारख्या कडू वनस्पतींची पाने वापरण्यात आली. त्यामध्ये शेण, गोमूत्र, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसणाचा ठेचा व पाणी मिसळून दशपर्णी अर्क तयार करण्यात आला.
साधारणपणे ३५ दिवसांत तयार होणारा हा अर्क सहा महिन्यांपर्यंत फवारणीसाठी वापरता येतो. रसशोषक किडी व विविध प्रकारच्या अळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तो प्रभावी ठरतो. स्थानिक स्तरावर सहज उपलब्ध होणाऱ्या वनस्पतींपासून तयार होत असल्याने याचा खर्च अत्यल्प येतो. नैसर्गिक घटकांपासून बनलेला असल्यामुळे पिके, प्राणी, मानव तसेच पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. यामुळे जमीन, पाणी व हवेचे प्रदूषणही टळते. तसेच मित्र कीटक, मधमाश्या आणि गांडुळांना कोणतीही हानी पोहोचत नाही. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
दशपर्णी अर्काचे महत्त्व लक्षात घेऊन झाशीची राणी गटातील सर्व महिला वर्षभर वेळोवेळी त्याची निर्मिती करून शेतामध्ये फवारणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी कृषी विभागाचे मेंटार राहुल मनवर, उमेदचे राजेंद्र कुरपूडे तसेच पाणी फाउंडेशनचे शुभम पंचबाई व रिटा ठवकर यांनी मार्गदर्शन केले. गटातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन दशपर्णी अर्क निर्मितीचा उपक्रम यशस्वी केला.


Comments
Post a Comment