पुसद कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांमध्ये ३० जूनला शाळा प्रवेशोत्सव
आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसदच्या कार्यक्षेत्रातील ८ शासकीय व १२ अनुदानित आश्रमशाळांमध्ये ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत उत्सवी वातावरणात करण्यात येणार असून विविध शैक्षणिक, प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवेशोत्सवानिमित्त नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार असून प्रभातफेरीद्वारे जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके, शालेय बॅग, पेन, पेन्सिल, इतर शैक्षणिक साहित्य तसेच नवीन शालेय गणवेशाचे वितरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उन्हाळी शिबिर, बोलका वर्ग, जेईई/नीट प्रवेशपूर्व परीक्षा प्रशिक्षण, महाराष्ट्र दर्शन यांसारख्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शासकीय आश्रमशाळा वडगाव (शिंदे) आणि पुसद येथे इयत्ता ११ वीचे वर्ग सुरू करण्यात आले असून, यावर्षी विद्यार्थी पटसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालेली आहे.
प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रकल्पांतर्गत वसतिगृहांचे गृहपाल यांची 'पालक अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी २९ जूनपासून संबंधित आश्रमशाळांमध्ये मुक्कामी राहून प्रवेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
राघोजी भांगरे योजनेंतर्गत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
प्रवेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी, तसेच आयुक्त व अपर आयुक्त कार्यालयातील अधिकारी विविध आश्रमशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे, शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंददायी वातावरण तयार करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने सकारात्मक सुरुवात करणे हा प्रवेशोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांनी दिली.
Comments
Post a Comment