अनुसूचित जातीच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये निवासी राहून सर्व सोयी-सुविधांसह मोफत शिक्षण दिले जाते.या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरण, भव्य व सुसज्ज शासकीय इमारत, तज्ज्ञ शिक्षकवृंद, सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत शैक्षणिक साहित्य व गणवेश, खेळाचे साहित्य, नाश्ता व भोजनाची व्यवस्था तसेच अद्ययावत डिजिटल रुमद्वारे उत्कृष्ट अध्यापनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या मुलांसाठी नबाबपूर ता. नेर, ईसापूर ता. दिग्रस, नाथनगर भंडारी ता. आर्णि व परसोडा ता. वणी येथे, तर मुलींसाठी पी.एम. श्री. शाळा आसारपेंड ता. पुसद, मरसुळ ता. उमरखेड, महागाव ता. महागाव व घाटंजी ता. घाटंजी या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. अधिक माहिती करिता तसेच प्रवेश अर्जाकरीता संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी थेट संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त मंगला मून यांनी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केले आहे.

Comments