युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांसाठी ठरला दिशादर्शक !

 समारोपीय सत्रात फेलोशिप संधींबाबत मुख्यमंत्री फेलोंचे मार्गदर्शन  स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबविण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा सोमवारी दि.1 जून रोजी विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्राने समारोप करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी आणि कुणाल पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून आयेाजित या संपूर्ण उपक्रमात प्रत्येक सोमवारी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवेतील अधिकारी रॉबीन बंसल, रेवैयाह डोंगरे, एन. भुवनेश्वर आणि उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, गंगाधर होवाळे, तहसीलदार हेमकृष्ण पिसदे यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रांना स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा संवाद कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी आणि कुणाल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध फेलोशिप्स, करिअर संधीबद्दल मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा प्रशासनासोबत केल्या जाणारे कामाचे स्वरुप, शासन व्यवस्थेतील अनुभव, तसेच धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणी यामधील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेलोशिप्सची माहिती देण्यात आली. त्यामध्ये लँप फेलोशिप, गांधी फेलोशिप, यंग इंडिया फेलोशिप, टिच फॉर इंडिया फेलोशिप, क्रिस्प फेलोशिप आणि नेहरू फेलोशिप यांसारख्या संधींबद्दल माहिती दिली. तसेच, जिल्हाधिकारी विकास मीना यांनी फेलोशिपमधून मिळणाऱ्या संधी, शिकण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष प्रशासनात काम करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यालयातील मुख्यमंत्री फेलोंच्या कामाचे कौतुकही केले. तसेच उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे यांनी देखील सत्रात सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
हे सत्र विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप्सची माहिती देण्यासह करिअरकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची संधी देणारे ठरले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती