उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांगांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
31 जुलैपर्यंत मुदत
दिव्यांग व्यक्तींच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दिव्यांगजन सक्षमीकरणासाठी वर्ष 2026 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज व नामनिर्देशने मागविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज व नामनिर्देशन स्वीकारण्याकरिता राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल 15 मे 2026 पासून खुले करण्यात आले असून 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. इच्छुक व्यक्ती, संस्था तसेच संबंधित घटकांनी आपले अर्ज व नामनिर्देशने केवळ ऑनलाइन पद्धतीने www.awards.gov.in या संकेतस्थळावर सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जामध्ये निर्धारित नमुन्यानुसार सर्व आवश्यक माहिती भरून दिव्यांग व्यक्ती किंवा संस्थेच्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व उत्कृष्ट कार्याचा सविस्तर तपशील नमूद करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कार्याची पुष्टी करणारी कागदपत्रेही पोर्टलवर अपलोड करावीत.
या राष्ट्रीय पुरस्कारांतील सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन आणि श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका या उपश्रेणींसाठी अर्ज करताना यूडीआयडी कार्ड अथवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
प्रत्यक्ष (ऑफलाइन) स्वरुपात किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे पात्र व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांसाठीची पात्रता, निकष व इतर सविस्तर माहिती दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या www.depwd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध आहे.
शासनाने दिलेल्या सुचनेनुसार दिव्यांगजनांना राष्ट्रीय पुरस्कारांसाठी जिल्हास्तरिय विभागांनी ऑनलाईन पध्दतीने शिफारस सादर करावी, असे आवाहन असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments
Post a Comment