जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती अभियान व सप्ताहाचे आयोजन

 सरकारी कामगार कार्यालयाचा उपक्रम जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त सरकारी कामगार अधिकारी तथा बालकामगार कृतीदलाद्वारे जिल्ह्यात बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान आणि विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस २००२ पासून संपूर्ण जगभर साजरा केला जात असून बालमजुरीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकींमध्ये दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था तसेच इतर आस्थापनांच्या प्रतिनिधींना बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम, बालमजुरी निर्मूलनाचे महत्त्व आणि संबंधित कायद्यांविषयी माहिती देवून जनजागृती करण्यात येणार आहे. यादरम्यान, व्यापारी वर्गाकडून आमच्याकडे कोणताही बालकामगार कार्यरत नाही आणि भविष्यातही बालकामगार ठेवणार नाही असे हमीपत्र भरून घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही आस्थापनेत १८ वर्षांखालील बालक अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवू नये, अन्यथा संबंधित आस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बालपणी काम करण्यामुळे मुलांच्या त्वचा, श्वसनसंस्था, मेंदू आणि जठरसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासात अडथळे निर्माण होतात. प्रत्येक बालकाला शिक्षण, आरोग्य आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. बालमजुरी मुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने सहभाग नोंदवावा आणि बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा. रा. काळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती