जिल्ह्यात नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्यमांच्या सर्वेक्षणाला सुरुवात

 जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते उद्घाटन  राज्यात पहिल्यांदाच होणार सर्वेक्षण : केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्राल याच्या मार्गदर्शनाखाली यांच्यामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणे राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात या सर्वेक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या सर्वेक्षणांद्वारे रोजगार, बेरोजगारीचे प्रमाण तसेच असंघटित क्षेत्राविषयी सविस्तर माहिती प्राप्त होते. या आकडेवारीचा उपयोग शासन विविध विकासात्मक योजना व धोरणे तयार करण्यासाठी करते. याच धर्तीवर राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारी उपलब्ध व्हावी या जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात पहिल्यांदाच ही दोन्ही सर्वेक्षणे राबविण्यात येत आहेत. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणाद्वारे रोजगार व बेरोजगारीची स्थिती, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार तसेच असंघटित रोजगार यासंदर्भातील अद्ययावत व विश्वासार्ह आकडेवारी प्राप्त होणार आहे. तर असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षणाद्वारे उत्पादन, व्यापार आणि सेवा या असंघटित क्षेत्रांतील (बांधकाम क्षेत्र वगळून) उद्यम आस्थापनांची संख्या, उपलब्ध रोजगाराचे स्वरूप (पगारी अथवा स्वयंरोजगारी), कार्यरत कामगारांची संख्या, प्रति कामगार व प्रति उद्यम आस्थापना स्थूल मूल्यवृद्धी, उत्पादकता, वेतन तसेच इतर महत्त्वपूर्ण आर्थिक निर्देशकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे राज्य व जिल्हा उत्पन्नाचे अंदाज तयार करणे तसेच जिल्हास्तरीय विकास निर्देशांकांचे मापन करणे शक्य होणार आहे. या सर्वेक्षणासाठी माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या ईप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे अन्वेषक व पर्यवेक्षक निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबांच्या मुलाखती घेऊन विहित नमुन्यात माहिती संकलित करणार आहेत. त्यासाठी हे अधिकारी व कर्मचारी सोमवार, दि. 15 जूनपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांना भेटी देण्यास सुरुवात करणार आहेत. या दोन्ही सर्वेक्षणांचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त मनोज गेडाम व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सर्वेक्षणाद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीची गुणवत्ता ही माहिती देणाऱ्या कुटुंबे, उद्योग व आस्थापना यांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांनी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय यांच्या वतीने कार्यरत असलेल्या अन्वेषक व पर्यवेक्षकांना योग्य, अचूक व परिपूर्ण माहिती देऊन सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती