स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज बंधनकारक
अर्ज करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी, १२ वी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रथम समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इयत्ता ११ वी, १२ वी तसेच सर्व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी १५ जुलै पर्यंत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर http://hmas.mahait.org अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावा.
सन २०२४-२५ पासून स्वाधार योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यभरातील महाविद्यालयांची वाढती संख्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशात होत असलेली वाढ लक्षात घेता सर्व पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा मिळत नसल्याने उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
याच पार्श्वभूमीवर शासनाने स्वाधार योजना सुरू केली असून, शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक आर्थिक मदत थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.
नव्या नियमानुसार, शासकीय वसतिगृहासाठी अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह तसेच स्वाधार योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यासच संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
Comments
Post a Comment