पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता 20 जूनला!

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण  देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ साजरा होणार  2.90 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल 2026 ते जुलै 2026 कालावधीतील 23 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दि. 20 जून, 2026 रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरीत होणार आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून केंद्र शासनाने दि. 20 जून, 2026 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाकडून लाभार्थीने भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, व ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. जिल्ह्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण 2.90 लाख शेतकरी कुटुंबांना दि. 20 जून, 2026 रोजी दुपारी 03:45 वाजता लाभ त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थीकडे फार्मर आयडी असणे देखील केंद्र शासनाने क्रमप्राप्त केले आहे. जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर, कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघटना, सहकारी पतसंस्था याठिकाणी हा समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरुनही या समारंभाच्या थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल. जिल्ह्यामध्ये सर्वदूर कृषी विभाग, महसूल विभाग, तसेच ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हा समारोह साजरा करण्यात येणार आहे. या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरून होणार आहे. या लिंकचा वापर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन