पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला २ जुलैपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला २ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता, अर्ज शुल्क व इतर आवश्यक माहिती संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेशासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागेल.
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरता येणार असून त्यांच्या शंका व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष पडताळणी तसेच ऑनलाइन पडताळणी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज संबंधित सुविधा केंद्राकडे पाठविला जाईल. ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच अर्ज निश्चित करण्यात येणार आहे.
विविध प्रवर्गांनुसार जात किंवा जमात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, सैन्य दल प्रवर्गाचे प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला टी.सी. सादर करणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रप्रमुख यू. एम. शिरभाते यांच्याशी संपर्क साधावा किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ए.पी. मटाले, यांनी केले आहे.
Comments
Post a Comment