शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरित
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते वितरण
कृषी विज्ञान केंद्रात थेट प्रक्षेपण कार्यक्रम उत्साहात
कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ व कृषी विभाग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी अधिकारी व विविध प्रकल्पांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीपक कच्छवे, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी कृष्णराव देशट्टीवार (पांढरकवडा), कीटकशास्त्र विषयातील शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, गृहविज्ञान शास्त्रज्ञ स्नेहलता भागवत तसेच कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, कृषिविद्या शास्त्रज्ञ डॉ. रुपेश झाडोदे उपस्थित होते. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्यदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगाल मधील ताराकेश्वर, हुगळी येथून देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पीएम किसान योजनेच्या २३ व्या हप्त्याचे ॲानलाईन वितरण करण्यात आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २ लाख ८९ हजार ७९९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी “खेत बचाव अभियान” अंतर्गत मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित खत वापर आणि शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी पी.एम. किसान योजनेच्या लाभांविषयी माहिती देत केंद्र शासनाच्या कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) योजनेची सविस्तर माहिती दिली व शेतकऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
डॉ. दीपक कच्छवे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना “खेत बचाव अभियान”, आगामी खरीप हंगामाचे नियोजन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी तसेच शाश्वत शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त कृष्णराव देशट्टीवार यांच्यासह प्रगतिशील शेतकरी प्रभाकर ठाकरे, देवसिंग पवार, राहुल पारधी व बेबी रामदास ढोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय राहुल चव्हाण यांनी केले. कृषी विभागाचे प्रदीप वाहने तसेच विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सुमारे १४० ते १५० शेतकरी, महिला शेतकरी, अधिकारी व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहून लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.










Comments
Post a Comment