एकल महिला धोरणासाठी 22 जूनला कार्यशाळा
नागरिक, एकल महिला, तज्ज्ञांना सूचना व अभिप्राय नोंदवता येणार
कार्यशाळेत सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी
एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक तसेच पुनर्वसनासंदर्भातील प्रश्नांचा सर्वंकष विचार करून स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्यात येणार आहे.
त्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, एकल महिलांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच इच्छुक व्यक्ती यांच्याकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी २२ जून रोजी जिल्हा परिषद परिसरातील महिला व बाल विकास भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
एकल महिलांसाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. या अनुषंगाने महिला व बाल विकास मंत्री तथा राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मसुदा समिती गठित करण्यात आली आहे.
दिनांक 1 जून 2026 रोजी आयोजित राज्यस्तरीय मसुदा समितीच्या बैठकीत एकल महिला धोरण अधिक व्यापक व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सूचना व अभिप्राय प्राप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक तज्ज्ञ व्यक्ती व अधिकारी यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून एकल महिला धोरणासाठी आपले मौल्यवान अभिप्राय व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
Comments
Post a Comment