माय भारत केंद्रातर्फे जिल्ह्यात ‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ मोहीम
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘मेरा युवा भारत’ माय भारत केंद्रातर्फे जिल्ह्यात ‘नेशन फर्स्ट चॅलेंज’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यवतमाळचे जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांची जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस ‘माय भारत’चे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे आणि रवी शेळके उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाने या देशव्यापी मोहिमेला जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी,जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचीही भेट घेण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांपर्यंत मोहिमेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर कसा करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनातून प्रेरित झालेल्या या मोहिमेत युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यासाठी पाच महत्त्वाच्या संकल्पांचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढविणे, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून इंधन बचत करणे, खाद्यतेलाच्या वापरात कपात करणे, स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि नैसर्गिक शेतीचा स्वीकार करणे या बाबींचा समावेश आहे.
स्वदेशी वस्तूंचा वापर करून देशांतर्गत उद्योगांना चालना देणे, सार्वजनिक वाहतूक व सायकलचा वापर करून ऊर्जा बचत करणे, निरोगी जीवनशैलीसाठी खाद्यतेलाचे प्रमाण कमी करणे, देशातील पर्यटन स्थळांना भेट देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांनी जिल्ह्यातील युवकांना ‘माय भारत’च्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सहभागी युवकांनी आपल्या दैनंदिन कृतींची छायाचित्रे आणि व्हिडिओ पोर्टलवर अपलोड करावेत. मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील लीडरबोर्डमध्ये स्थान मिळणार असून त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या उपक्रमाचे स्वागत करत युवकांची ऊर्जा सकारात्मक, शाश्वत आणि राष्ट्रहिताच्या सवयींकडे वळविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे सामाजिक जाणीव वाढण्यासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Comments
Post a Comment