नवजवान शेतकरी गटाद्वारे बीज उगवण क्षमता चाचणी
पाणी फाउंडेशन, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ स्पर्धेमुळे राज्यभरातील शेतकरी गटांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गटशेतीच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळविण्यासाठी शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे.
यंदा अल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाऊस, पावसातील खंड, कोरड्या दुष्काळाची शक्यता, दुबार पेरणी, सिंचनाची कमतरता आणि उष्णतेच्या लाटेचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील चिंचोली येथील नवजवान शेतकरी गटाने शास्त्रीय शेतीचा मार्ग स्वीकारला आहे.
गटाचे निमंत्रक अमोल प्रभाकरराव ठाकरे यांच्यासह ११ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवजवान शेतकरी गटाची स्थापना केली आहे. सोयाबीन पिकाचे घटते उत्पादन आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता, उत्पादनात वाढ करून शेती अधिक फायदेशीर करण्याचा निर्धार गटाने केला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यावर गटाचा भर आहे.
याच अनुषंगाने कृषी विभागाचे मेंटार राहुल मनवर, उमेदचे राजेंद्र कुरपूडे तसेच पाणी फाउंडेशनचे शुभम पंचबाई व रिटा ठवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी घरच्या घरी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करण्याचे प्रात्यक्षिक घेतले.
या चाचणीद्वारे पेरणीपूर्वीच बियाण्याची उगवण क्षमता समजू शकते. त्यामुळे कमी उगवणक्षमतेचे बियाणे पेरणीसाठी टाळता येते व शेतात आवश्यक रोपसंख्या राखणे शक्य होते. परिणामी पेरणीवरील खर्च वाया जात नाही आणि उत्पादन वाढीस मदत होते.
प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांना गोणपाट किंवा सुती कापड वापरून १०० बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. तीन ते चार दिवसांनंतर निरीक्षण करून उगवलेल्या बियाण्यांची संख्या मोजण्यात येते. १०० पैकी ७० किंवा त्याहून अधिक बियांना मोड आले असल्यास बियाणे उत्तम दर्जाचे समजले जाते. अशा बियाण्यासाठी प्रतिएकर ३० किलो बियाणे वापरण्याची शिफारस करण्यात आली. उगवण क्षमता ६० टक्के असल्यास ३५ किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला, तर ५० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरू नये, असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गटातील सर्व सदस्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच सरी-वरंबा पद्धत, उताराला आडवी पेरणी, पट्टा पद्धत आणि बीबीएफ पद्धतीचा अवलंब करून एकात्मिक पीक व्यवस्थापन राबविण्याचा निर्णय घेतला.

Comments
Post a Comment