सर्वोच्च न्यायालयात ‘समाधान समारोह 2026 विशेष लोकअदालतीचे आयोजन
सर्वसामान्यांना सहज, सुलभ आणि जलद न्याय मिळावा तसेच परस्पर सामंजस्य व सहमतीच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा व्हावा या उद्देशाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयातर्फे ‘समाधान समारोह 2026 विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 21, 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणांचा समावेश राहणार आहे. या प्रकरणांमध्ये लोकअदालतीपूर्वी सामंजस्याने तडजोड घडवून आणण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका तसेच उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरणांच्या मध्यस्थता केंद्रांमध्ये पूर्वबैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संबंधित सर्व घटकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती आणि उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरणांच्या मध्यस्थता केंद्रांमध्ये प्रशिक्षित मध्यस्थ, सचिव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी पक्षकारांना आवश्यक सहकार्य करणार आहेत.
सामंजस्य व तडजोड बैठकींमध्ये पक्षकारांना प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभागी होता येणार आहे. ‘समाधान समारोह 2026 विशेष लोकअदालतीमध्ये सहभाग नोंदविण्यास इच्छुकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment