पुसदला आता नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय!

Ø शासनाची मिळाली मान्यता; कार्यक्षेत्रात दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांचा समावेश Ø सूचना व हरकती नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मान्यता दिली आहे. या कार्यालयाचे मुख्यालय पुसद येथे प्रस्तावित करण्यात आले असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यासंदर्भात सार्वजनिक हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. शासन निर्णयातील तरतुदींनुसार या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासकीय सोय आणि लोकहिताच्या दृष्टीने पुसद येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, कार्यक्षेत्र निश्चित करताना तालुका हा मूलभूत घटक मानण्यात आला असून कोणत्याही तालुक्याचे विभाजन दोन उपविभागात करण्यात आलेले नाही. याबाबत कोणत्याही व्यक्तीस हरकत किंवा सूचना नोंदवायची असल्यास, जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निर्णयासाठी पाठविण्यात येणार आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती