शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तंबाखू विरोधी सप्ताह साजरा जनजागृती कार्यक्रमातून तंबाखूमुक्तीचा संदेश
तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे ३१ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत तंबाखू विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित या सप्ताहात पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. ई-सिगारेट आणि फ्लेवर तंबाखूच्या वाढत्या वापराबाबत विशेष जनजागृती करण्यात आली.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तसेच हृदयविकारांसह अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. भारतातील सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी सुमारे २७ टक्के कर्करोग तंबाखू सेवनाशी संबंधित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके आणि जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह राबविण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना तंबाखूमुक्त जीवनाचा संदेश दिला.
नागरिकांनी स्वतः तंबाखूपासून दूर राहून कुटुंब आणि समाजातही तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन सोयाम, डॉ. पुष्पा लोकरे, डॉ. मोनिका मसारे तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ. आंचल रंगारी, डॉ. निखिलेश नागतोडे, डॉ. देवयानी वंजारी, स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. संमृद्धी घाटोडे, डॉ. पूजा उत्तरवार, समाजसेवा विभागाचे नोडल अधिकारी रविंद्र निचळे, वरिष्ठ निवासी, पदव्युत्तर व आंतरवासिता विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment