यवतमाळ पोलिसांची अद्वितीय कामगिरी!
प्रतिकूल परिस्थितीत शोधमोहीम : ९० फूट खोल विहिरीतून मृतदेह काढण्यात यश
महागाव तालुक्यातील मौजा घाना येथील भगवान भाकरे (वय ३५) हे बेपत्ता असल्याचे कळताच जिल्हा शोध व बचाव पथकाने महागाव येथे धाव घेतली. रात्री सुमारे ९.१५ वाजता अंधार आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही पोलिस कर्मचाऱ्यांनी धाडस व तत्परता दाखवत विहिरीत उतरून शोधकार्य सुरू केले. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत आवश्यक सुरक्षा उपायांचा अवलंब करून पोलिस पथकाने सुमारे ९० फूट खोल विहिरीत उतरून मृतदेह यशस्वीरित्या बाहेर काढला. या कार्यवाहीमुळे पुढील पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे शक्य झाले.
भगवान भाकरे हे बेपत्ता असल्याची माहिती तहसीलदार महागाव यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांना दिल्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला पोलीस विभागाच्या मदतीने तातडीने शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई जलदगतीने करण्यात आली.
यवतमाळ पोलिसांच्या या धाडसी व कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. संकटाच्या प्रसंगी पोलिस दलाने दाखविलेली तत्परता, धैर्य आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.शोध व बचाव मोहीम किशोर भगत, अमर भवरे, नितीन पन्नासे आणि नितीन बुरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आली.









Comments
Post a Comment