जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने झरी जामणी येथे कायदेविषयक कार्यक्रम उत्साहात संपन्न
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,आनंद एल यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, झरी जामणी आणि तालुका प्रशासन, झरी जामणी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती, झरी जामणी येथील सभागृहात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळचे सचिव दिपक एच. दाभाडे होते. यावेळी तहसीलदार अक्षय रासने, पोलीस निरीक्षक सतिश जाधव, पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर. व्ही. भोयर तसेच अॅड. आर. व्ही. मदिकुंटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. डी. व्ही. काटकर यांनी केले. झरी जामणी हा आदिवासीबहुल तालुका असून अनेक नागरिक शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. अशा नागरिकांपर्यंत कायदेविषयक माहिती आणि शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. आर. व्ही. मदिकुंटावार यांनी प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, १९९४ तसेच त्यामधील २००३ मधील सुधारणांविषयी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. अवैध गर्भपात आणि गर्भलिंग तपासणी हे कायद्याने दंडनीय गुन्हे असल्याचे त्यांनी सोप्या उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर. व्ही. भोयर यांनी पात्र लाभार्थींना मोफत विधी सेवा कशी मिळू शकते याची माहिती दिली. तसेच महिलांवरील घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याबाबतही मार्गदर्शन केले.
तहसीलदार अक्षय रासने यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत उपस्थित महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा तसेच इतरांपर्यंतही ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात सचिव दिपक एच. दाभाडे यांनी मुलगा-मुलगी भेदभाव न करता महिलांचे सक्षमीकरण होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच नालसा आशा युनिटच्या माध्यमातून बालविवाह, घरगुती हिंसाचार आणि लैंगिक अत्याचारग्रस्त पीडितांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती दिली. याशिवाय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि मोफत विधी सेवेबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. डी. व्ही. काटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. आर. एम. बोथले यांनी केले. या शिबिरास तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment