युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन इंडो-जर्मन टूल रूम व ‘अमृत’चा संयुक्त उपक्रम
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि इंडो-जर्मन टूल रूम भारत सरकारची संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पात्र उमेदवारांना अत्याधुनिक तांत्रिक प्रशिक्षण, रोजगारासाठी सहाय्य तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या इंडो-जर्मन टूल रूमची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे असून पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूंज येथे उपकेंद्रे आहेत. आधुनिक यंत्रसामग्री व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था देशभरात ओळखली जाते. या प्रशिक्षणाचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना मिळावा यासाठी ‘अमृत’ आणि आयजीटीआर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून सुमारे ४५ विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च ‘अमृत’ संस्थेमार्फत उचलला जाणार आहे. प्रशिक्षण शुल्कासह निवास व भोजन व्यवस्थेचाही खर्च संस्थेकडून करण्यात येणार आहे. निवासी प्रशिक्षणाची सुविधा केवळ छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध असून पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूंज केंद्रांमध्ये अनिवासी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन सीएनसी मशीन ऑपरेटर, मशिनिंग तंत्रज्ञान, उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक देखभाल कौशल्ये, संगणकाधारित तांत्रिक प्रशिक्षण यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम या उपक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील युवक-युवतींना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढविणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
पात्रता व अर्ज प्रक्रिया
या प्रशिक्षणासाठी अर्जदार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील आणि ‘अमृत’च्या लक्षित गटातील असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. संबंधित अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर अटी आयजीटीआरच्या नियमानुसार लागू राहतील.
इच्छुक उमेदवारांनी ‘अमृत’च्या संकेतस्थळावर www.mahaamrut.org.in ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. अंतिम निवड यादी अमृत व आयजीटीआरच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र व रोजगाराच्या संधी
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र रोजगारासाठी अर्ज करताना उपयुक्त ठरणार असून विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयजीटीआरमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
स्वयंरोजगारासाठीही मदत
स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ‘अमृत’ची वैयक्तिक व्याज परतावा योजना उपलब्ध असून तांत्रिक मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल तयार करणे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींनी या कौशल्य विकास उपक्रमाचा लाभ घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा खुल्या कराव्यात, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अमृत कार्यालय, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment