शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचे आवाहन
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता शासकीय आदिवासी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पांढरकवडा प्रकल्पांतर्गत मुलींसाठी ९ आणि मुलांसाठी १० अशी एकूण १९ वसतिगृहे कार्यरत असून प्री-मॅट्रिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेशासाठी नवीन तसेच जुन्या विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता व शासनाच्या नियमांनुसार राबविण्यात येणार असून वसतिगृहातील उपलब्ध रिक्त जागांच्या अधीन राहून प्रवेश देण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, प्रवेश पावती, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुकची प्रत, दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला तसेच लागू असल्यास अनाथ किंवा अपंगत्वाचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची छापील प्रत संबंधित वसतिगृहाच्या गृहपालांकडे जमा करून पावती घ्यावी. वसतिगृहातील जुन्या विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य असून त्यांनी ‘रिन्यू’ हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सहायक प्रकल्प अधिकारी पांढरकवडा वाय. एस. आठवले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment