टीडीआरएफ संस्थेला नियमानुसार जिल्हा युवा पुरस्कार प्रदान -जिल्हा क्रीडा अधिकारी यांची माहित
दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीची खातरजमा करण्याचे आवाहन
जिल्हा युवा पुरस्कार प्रक्रिया ही शासन निर्णयातील निकष, नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शकपणे राबविण्यात आली असून १ मे २०२६ रोजी प्रदान करण्यात आलेला जिल्हा युवा पुरस्कार हा पूर्णतः नियमसंगत व निर्धारित प्रक्रियेनुसार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुक्सवार यांनी दिली आहे.
१ मे महाराष्ट्रदिनी जिल्हा युवा पुरस्कार सन २०२४-२५ संदर्भात काही वर्तमानपत्रे तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांमध्ये वस्तुस्थितीविरुद्ध व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
वस्तूस्थितीनुसार जिल्हा युवा पुरस्कारासाठी लक्ष्य बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ अंतर्गत कार्यरत टी.डी.आर.एफ. अर्थात टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या संस्थेने नियमानुसार प्रस्ताव सादर केला होता. १२ नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार या प्रस्तावाची छाननी व मूल्यांकन प्रक्रिया करण्यात आली.
या संस्थेच्या मूळ उद्दिष्टांमध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत व सहकार्य करणे हे कार्य समाविष्ट आहे. तसेच धर्मादाय आयुक्त, यवतमाळ यांनी २९ मे २०२४ रोजी मंजूर केलेल्या घटना दुरुस्तीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अतिरिक्त उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला आहे. टी.डी.आर.एफ. या नावाचा समावेश दुरुस्तीनंतर करण्यात आला असला तरी संस्थेमार्फत पूर्वीपासूनच आपत्तीग्रस्तांना मदत व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
शासन निर्णयानुसार अर्जदार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पोलीस चारित्र्य दाखला सादर करणे आवश्यक असून संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी स्वतःचा चारित्र्य दाखला नियमानुसार सादर केला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थेस १ मे २०२६ रोजी प्रदान करण्यात आलेला जिल्हा युवा पुरस्कार हा पूर्णतः नियमसंगत व निर्धारित प्रक्रियेनुसार प्रदान करण्यात आलेला आहे.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आक्षेपांबाबत निदर्शनात आले आहे की, या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार किंवा अर्ज कार्यालयाकडे प्राप्त झाला नव्हता. तसेच बातमी प्रकाशित करण्यापूर्वी संबंधित माध्यम प्रतिनिधींनी कार्यालयाशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नव्हता.
आक्षेपांमध्ये उल्लेख केलेल्या जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय संस्था, उमरसरा, यवतमाळ यांच्या प्रस्तावाची तपासणी करण्यात आली असता, शासन निर्णयानुसार पुरस्कारासाठी मागील तीन वर्षांतील कार्यांचा विचार केला जातो. मात्र सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये विचाराधीन कालावधीत केवळ एकच कार्य आढळून आले असून उर्वरित कागदपत्रे निर्धारित कालावधीबाहेरील असल्याने ती ग्राह्य धरण्यात आली नाहीत. त्यामुळे सदर संस्था पुरस्कारासाठी पात्र ठरली नाही.
जिल्हा युवा पुरस्कार प्रक्रिया ही शासन निर्णयातील निकष, नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शकपणे राबविण्यात आली असून प्रसारित आक्षेप हे वस्तुस्थितीविरुद्ध, दिशाभूल करणारे व निराधार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी तसेच माध्यम प्रतिनिधींनी कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून वस्तुस्थितीची खातरजमा करावी, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment