मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करा

 जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर व अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज महसूल भवन येथे विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, पूनम अहिरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने कार्य करून मान्सूनपूर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टी अथवा पूरस्थितीत तात्काळ बचाव व मदतकार्य राबविण्यासाठी आवश्यक वाहने, यंत्रसामग्री व प्रतिसाद पथके (रिस्पॉन्स टीम) सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरी व ग्रामीण भागातील नाले, गटारे, नदीपात्रे आणि रस्त्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करावी, जलसंधारणाची कामे पूर्ण करावी, धोकादायक पुलांची तपासणी करावी तसेच तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश त्यांनी दिले. ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करून संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले. नदीकाठावरील गावांमध्ये उद्घोषणा यंत्रणा कार्यरत ठेवावी, अवैध होर्डिंग्ज हटवावीत, स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित ठेवावीत तसेच पोलीस प्रशासनानेही सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बाधित भागांमध्ये मदतकार्य वेळेत पोहोचण्यासाठी अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गरोदर महिलांसाठी आरोग्य सुविधा कार्यरत ठेवणे, वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन करणे तसेच रस्ते, पूल, शाळा आणि शासकीय इमारतींची स्थिती सुरक्षित असल्याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी नागरिकांना व संबंधित यंत्रणांना आपत्तीपूर्व सूचना व हवामानविषयक माहिती मिळविण्यासाठी 'दामिनी' आणि 'सचेत' या मोबाईल अॅप्सचा अधिकाधिक वापर करावा. तसेच आपत्तीचा प्रसंगी मदतीकरिता जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07232240720 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती