28 जूनला टीईटी परीक्षा!

यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 28 जून रोजी दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या निर्देशानुसार परीक्षेच्या सुरळीत व पारदर्शक आयोजनासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून परीक्षार्थ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत होणार आहे. पहिल्या पेपरसाठी जिल्ह्यात 19 परीक्षा केंद्रांची तर दुसऱ्या पेपरसाठी 28 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेतील पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक परीक्षा कक्षात लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सर्व परीक्षार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी व फ्रिस्किंग तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांनी पहिल्या पेपरसाठी सकाळी 8.30 वाजता आणि दुसऱ्या पेपरसाठी दुपारी 12.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. पहिल्या पेपरसाठी सकाळी 10.10 नंतर आणि दुसऱ्या पेपरसाठी दुपारी 2.10 नंतर कोणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच त्याची सत्यप्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, इअरफोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिक पडताळणीच्या अनुषंगाने परीक्षार्थ्यांचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याने परीक्षा कक्षात दुपट्टा, बुरखा, मास्क किंवा टोपी परीक्षा कक्षात परवानगी दिली जाणार नाही. दिव्यांग परीक्षार्थ्यांना लेखनिकाची आवश्यकता आहे, त्यांनी परीक्षा परिषदेच्या सूचनांनुसार आवश्यक प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक, यवतमाळ यांच्याकडे सादर करून परीक्षेपूर्वी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर ऐनवेळी लेखनिकास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षार्थ्यांनी सर्व सूचनांचे पालन करून वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन शिक्षधाधिकारी प्राथ,जिल्हा परिषद तथा जिल्हा नियंत्रक समिती,यवतमाळ करण्यात आले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती