नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती
यवतमाळ, दि.10 (जिमाका) : नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आकांक्षित तालुका झरी जामणी येथे सांस्कृतिक मंत्रालयाच्या केंद्रीय प्रभारी अधिकारी तथा संचालक पल्लवी होळकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांसाठी नीती आयोगाने पल्लवी होळकर यांची केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी, प्रगती, अडचणी व पुढील संधी यांचा अभ्यास केला. तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व भागधारक यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.
नीती आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व झरी जामणी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नीती आयोग व राज्य शासनामार्फत आरोग्य व पोषण, शिक्षण, आर्थिक समावेशन, मूलभूत सुविधा, सामाजिक विकास, कृषी व संलग्नित सेवा या क्षेत्रांतील 40 निर्देशकांची निवड करण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने केंद्रीय प्रभारी अधिकारी पल्लवी होळकर यांनी 5 फेब्रुवारी रोजी झरी जामणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शिबला, अंगणवाडी केंद्र, शिबला चौफुली, सार्वजनिक वाचनालय, ग्रामपंचायत शिबला तसेच महिला बचत गट, पाटण येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या सेवा, लाभार्थ्यांना मिळणारे लाभ व कामकाजाची गुणवत्ता याबाबत आढावा घेऊन त्यांनी आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजना सुचविल्या. या पाहणी दरम्यान तहसीलदार अक्षय रासने, गटविकास अधिकारी र. वि. सांगळे, आकांक्षित तालुका फेलो अनिल नरवाडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणावर भर
ग्राम व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत केंद्रीय प्रभारी अधिकारी पल्लवी होळकर यांनी विकास प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, उपलब्ध संधी आणि त्यावरील उपायांबाबत सविस्तर चर्चा केली. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांची आर्थिक व सामाजिक स्थिती कशी सुधारत आहे, याची माहिती त्यांनी घेतली. महिलांनी नवीन उद्योग, स्वयंरोजगार उपक्रम सुरू करावेत, असे आवाहन करून महिला सक्षमीकरणावर त्यांनी विशेष भर दिला.
तसेच कृषी व संलग्नित सेवा, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, आजीविका व अंगणवाडी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून झरी जामणी हा प्रेरणादायी आकांक्षित तालुका व्हावा, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृती आराखड्यावर चर्चा
केंद्रीय प्रभारी अधिकारी पल्लवी होळकर यांच्या अध्यक्षतेखाली 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विभागांना भेडसावणाऱ्या अडचणी, विकासातील संधी आणि पुढील कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड, रवी सांगळे, प्रकल्प संचालक (उमेद व प्रधानमंत्री आवास योजना) पिंगळे, स्वाती आस्थाना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत युवराज मेहत्रे, आकांक्षित तालुका फेलो अनिल नरवाडे तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.





Comments
Post a Comment