वणी, पुसद आणि यवतमाळात युवकांसाठी कौशल्य मेळावा
यवतमाळ, दि.9 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण युवक-युवतींसाठी वणी, पुसद आणि यवतमाळ येथे कौशल्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आरसेटी योजनेंतर्गत माहिती व जनजागृतीसाठी दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकरी मंदिर, वणी येथे, 12 फेब्रुवारी 2026 रोजी जुनी पंचायत समिती सभागृह, पुसद येथे आणि 17 फेब्रुवारी 2026 रोजी सेंट्रल सेलिब्रेशन हॉल, यवतमाळ येथे भव्य कौशल्य मेळावे होणार आहेत.
ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत व सेंट्रल बँक ऑफ इंडिया संचालित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) योजनेंतर्गत ग्रामीण भागातील 18 ते 50 वयोगटातील युवक-युवतींना 10 ते 45 दिवसांपर्यंतच्या कालावधीत स्वयंरोजगारासंबंधी मोफत निवासी व अनिवासी प्रशिक्षण दिले जाते. या मेळाव्यांमधून आरसेटी योजनांची माहिती देण्यात येणार असून उपलब्ध प्रशिक्षण, उद्योग-व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच आरसेटी प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांची नोंदणीही करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये शेतीविषयक उद्योगजकता, प्रक्रिया विषयक उद्योगजकता, उत्पादनाधारित उद्योगजकता तसेच सामान्य उद्योगजकता अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या कौशल्य मेळाव्यांना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment