ग्रामीण रुग्णालय वणी येथे 3 रुग्णांवर हायड्रोसिल शस्त्रक्रिया यशस्वी Ø जिल्ह्यात 144 अंडवृद्धी रुग्णांची नोंद
यवतमाळ, दि.10 (जिमाका) : जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम तसेच हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत 7 फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय वणी येथे हायड्रोसिल अर्थात अंडवृद्धी तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या 3 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
हे शिबीर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. टी. ए. शेख यांच्या सूचनेनुसार मोहिमेला गती देण्यात आली.
या मोहिमेत जिल्ह्यात एकूण 144 अंडवृद्धी रुग्णांची नोंद असून, ग्रामीण रुग्णालय वणी येथे आयोजित शिबिरात 5 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी भरती करून संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर 2 रुग्ण तांत्रिक वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरले.
या शिबिराचे नियोजन ग्रामीण रुग्णालय वणी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलभेवार, सर्जन डॉ. शिरीष ठाकरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर थेरे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली करण्यात आले. रुग्णांना आवश्यक उपचार व मार्गदर्शन देऊन शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया व उपचार मोफत करण्यात आले.
हत्तीरोग निर्मूलनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे प्रत्येक बुधवारी भरती व शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय वणी येथे प्रत्येक गुरुवारी भरती व शुक्रवारी शस्त्रक्रिया आणि श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे सुट्टीचे दिवस वगळून सर्व दिवशी रुग्णांची भ्रती व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या आरोग्य सुविधांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment