जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता; जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

यवतमाळ, दि. २४ : नागपूरच्या मौसम विज्ञान विभागाने २४ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात दि. २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान काही भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विज पडुन होणारी जिवित हानी व वादळी वा-यामुळे घरांची भिंत, टिनपत्रे पडुन होणारी जिवितहानी व वित्त हानी टाळण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून "काय करावे, काय करू नये" याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. त्यानुसार नैसर्गिक वीज पडून मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. अद्ययावत हवामान माहितीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे ‘सचेत’ अॅप तसेच ‘दामिनी’ अॅप डाउनलोड करून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वारा/ विजा चमकत असल्यास घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराच्या दरवाजे खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे. गाडी चालवीत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. उघडयावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणुन लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. मोकळया तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दुर रहा जंगलामध्ये दाट, लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. काय करु नये गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळया जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे/बस/सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/ दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी ठिकाणे टाळावेत. वादळी वारा यामुळे होणारे नुकसान टाळण्याकरीता दक्षता घेण्यात यावी. १. वादळी वा-यासह, विजांच्या कडकडासह पाऊस येत असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी पोहचून आश्रय घ्यावा. २. शक्यतो मोठ्या झाडांचा, टिनपत्रे असलेल्या शेडचा, जिर्ण इमारतीचा आश्रय घेऊ नये. ३. आपण शेतात असल्यास, पाऊसाचा अंदाज, आभाळ असल्यास तात्काळ घराकडे प्रस्थान करावे किंवा मजबुत अशा सुरक्षित स्थळाचा आश्रय घ्यावा. ४. वाहन चालवित असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घेऊन स्वतः जवळील मोबाईल बंद करण्यात यावे, जेणे करून आपल्याकडे विज आकर्षित होणार नाही. ५. विजेच्या वस्तुंशी संपर्क ठेवू नये व त्या पासुन दुर राहावे. ६. वादळी पाऊस व विजांचा कडकडाट सुरु असल्यास अशावेळी घरातच राहावे. ७. घर सुरक्षीत करुन आवश्यक दुरुस्ती करावयाची असल्यास ती करुन घ्यावी, विशेषतः छत दुरूस्ती करून घ्यावी, तीक्ष्ण वस्तू सैल सोडू नयेत. ८. आपल्या सभोवताल असलेली किडलेली झाडे / तुटलेल्या फांदया काढुन टाकाव्यात जेणेकरुन विज पडुन किंवा वादळ वा-यापुर्वी झाडे पडून नुकसान होणार नाही. ९. या कालावधीत सर्व विद्युत उपकरणे अनप्लग करुन घ्यावे तसेच टिन पत्रे व मेटल शिट असलेल्या वस्तुंपासुन दुर रहावे. १०. झाडांच्या जवळ किंवा झाडा खाली आसरा घेऊ नये. ११. वादळाने नुकसान झालेल्या भागापासुन / घरापासुन दुर राहावे. १२. पडलेल्या झाडापासून / पडलेल्या विज तारांपासुन दुर रहावे. शेतामध्ये पिक काढणीस आलेल्या पिकांची तात्काळ काढणी करून घ्यावी. तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीस ठेवलेले धान्य विक्रीस वेळ असल्यास त्या धान्यावर ताडपत्री आच्छादन तयार करून सुस्थितीत ठेवावे. जेणेकरून गारपिट किंवा वादळी पाऊस आल्यास धान्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान