आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी जेईई, सीईटी, नीट परीक्षा प्रशिक्षणाची संधी Ø 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे Ø प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांचे आवाहन Ø नामांकित खासगी संस्थांमार्फत दोन वर्षांचे निवासी प्रशिक्षण

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी जेईई/सीईटी तसेच वैद्यकीय नीट प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी नामांकित खासगी संस्थांमार्फत दोन वर्षांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रक्षिणासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी केले आहे. या योजनेमुळे राज्यातील दुर्गम भागातील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच (आयआयटी) सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास सक्षम होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नीट व सीईटी/जेईई या योजनेंतर्गत अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी राज्यात चार केंद्रे प्रवेशासाठी राज्यात चार केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. अमरावती येथील शासकीय आश्रमशाळा, गोटेवाडी (कळमनुरी प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुले व नीटसाठी 50 मुले; नागपूर येथील शासकीय आश्रमशाळा, सिंधीविहीर (वर्धा प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुली व नीटसाठी 50 मुली; नाशिक येथील शासकीय आश्रमशाळा, मुर्देगाव-बोपेगाव (नाशिक प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुले व नीटसाठी 50 मुले; ठाणे येथील एकलव्य आश्रमशाळा, शेडेंगाव (शहापूर प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुली व नीटसाठी 50 मुली अशी प्रवेश क्षमता असलेले चार केंद्रे राहणार आहेत. पात्रतेचे निकष : विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तो अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा व प्रवेशावेळी जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तसेच संबंधित विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया : सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, जे मार्च 2026 च्या दहावी परीक्षेस बसले आहेत आणि नीट व सीईटी/जेईई प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आपले अर्ज 24 फेब्रुवारीपर्यंत पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या शिक्षण विभागात सादर करावेत, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस