जिल्ह्यातील नवीन उद्योगांना चालना ; सेंट्रल बँक ऑफ इंडिया व एमआयडीसी यवतमाळ यांच्यात सामंजस्य करार

यवतमाळ, दि.9 (जिमाका) : जिल्ह्यातील जुन्या व नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी व त्यांच्या कर्ज प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया व एमआयडीसी यवतमाळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांनी दिली. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अमरावती व एमआयडीसी यवतमाळ असोसिएशन यांच्या संयुक्त पुढाकाराने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच उद्योगांसाठी आवश्यक कर्ज पुरवठा सुलभ करण्याच्या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह, दारव्हा रोड, यवतमाळ येथे क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ एमआयडीसी असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश अग्रवाल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव आनंद भुसारी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक सुशील गरुड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी स्थानिक उद्योजक, सूक्ष्म व लघु उद्योग व्यावसायिक, नवउद्योजक (स्टार्ट-अप्स), महिला उद्योजक तसेच बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बँकेच्या अधिकाऱ्यांनी उद्योगांसाठी उपलब्ध विविध एमएसएमई कर्ज योजना, व्याजदर सवलती, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा तसेच विविध शासकीय अनुदान योजनांची सविस्तर माहिती दिली. याशिवाय प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुद्रा योजना व इतर शासकीय योजना, डिजिटल पेमेंट, उद्यम नोंदणी प्रक्रिया, महिला उद्योजकांसाठी विशेष योजना तसेच उद्योगवाढीसाठी वित्तीय साक्षरता याबाबत जनजागृती करण्यात आली. ‘ग्राहक मिलन’चे आयोजन या आउटरीच कार्यक्रमादरम्यान ग्राहक मिलनाचे आयोजन करण्यात आले. व्यापारी, हितसंबंधित घटक व बँक कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमास उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील एमएसएमई क्षेत्राला नवे बळ मिळेल व सेंट्रल बँक ऑफ इंडिया आर्थिक समावेशन व पारदर्शक कर्ज वितरणासाठी आपले कार्य अधिक सक्षम करेल, अशी भावना एमआयडीसी असोसिएशन, यवतमाळ यांच्यातर्फे व्यक्त करण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व अनुदानाबाबत माहिती देत नवउद्योजकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले. याच कार्यक्रमादरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अमरावती व एमआयडीसी यवतमाळ असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच नवीन उद्योगांसाठी सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे मंजूर करण्यात आले असून, कर्ज मंजुरी पत्रे मान्यवरांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास अमरावती येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य व्यवस्थापक शीतल मेश्राम, यवतमाळ शाखेचे वरिष्ठ प्रबंधक जयंत धकिते तसेच बँकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व उद्योजक, ग्राहक व मान्यवरांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे आभार मानले. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस