चाईल्ड हेल्पलाईनमुळे चार बालविवाह रोखण्यात यश Ø १०९८ क्रमांकाची हेल्पलाईन २४ तास कार्यरत
यवतमाळ, दि. २४ (जिमाका) : नववर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात चार अल्पवयीन बालिकांचे नियोजित बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन १०९८ व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. या प्रकरणांमध्ये यवतमाळ तालुक्यातील वाघाडी, नेर तालुक्यातील रत्नापूर बेडा, बाभूळगाव तालुक्यातील गणोरी, आणि महागाव तालुक्यातील पिंपळगाव इजारा, येथील बालविवाहांचा समावेश आहे.
मागील वर्षात जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ६० पेक्षा अधिक बालविवाह संदर्भातील चाईल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमांकावर कॉल प्राप्त झाले होते. प्राप्त माहितीनुसार तात्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संबंधित कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले.
विवाहासाठी मुलाचे किमान वय २१ वर्षे तर मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलीच्या विवाहाबाबत माहिती मिळताच पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ विषयी सविस्तर माहिती देऊन बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत बालविवाह लावणाऱ्या, त्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या किंवा सोहळा पार पाडणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची कैद व एक लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून तसेच अंगणवाडी सेविका यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधी तथा परिविक्षा अधिकारी महेश हळदे, चाईल्ड हेल्पलाईन सुपरवायझर मनीष शेळके, पूनम कनाके, गणेश आत्राम, केस वर्कर पूजा शेलारे, अश्विनी नासरे, शुभम कोंडलवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने पार पडली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर आणि चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून मुलांच्या भविष्याशी खेळ करणारा प्रकार आहे. त्यामुळे पालकांनी मुला-मुलींचे वय कायद्यानुसार पूर्ण झाल्यानंतरच विवाह करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बालविवाहाबाबत माहिती असल्यास २४ तास कार्यरत असलेल्या १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment