‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान · वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन

मुंबई, दि. १६ : संतांच्या भूमीत गुरू तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदान, खारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, तसेच आरोग्य, शिक्षण, पोलीस विभागांचे प्रतिनिधी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, संस्कृती रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी गुरू तेग बहादुर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शहादतीचा इतिहास शाळा, महाविद्यालये, संस्था आणि गुरुद्वारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ लाख २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. थीम साँग, माहितीपटाद्वारे प्रचार-प्रसिध्दी याशिवाय व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून २०० शाळा जोडण्यात आल्या असून, थीम साँग आणि माहितीपटाद्वारे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येत आहे. चेंबूर, देवनार आणि मानखुर्द येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे. या शहीदी समागमाच्या निमित्ताने सिख, सिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी सुमारे ३०० वर्षांनंतर एकत्र येणार असून, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दृढ होणार आहे. येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पश्चिम उपनगरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, सहा.जनसंपर्क अधिकारी बृह्न्मुंबई महानगरपालिका विवेक राठोड, उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगर कल्पना गोडे, तहसिलदार (महसूल) युवराज बांगर, तहसिलदार बोरीवली मुंबई उपनगर इरेश चप्पलवार, शासकीय सदस्य, तहसिलदार अंधेरी स्नेहलता स्वामी, शासकीय सदस्य, नायब तहसिलदार कुर्ला सुनिल कापडनिस निवासी, श्री.मनमोहन सिंग, एव्हर साईन, मालाड, श्री.सुखविंदर सिंग चेंबुरकॅम्प, गुरपिंदर सिंग, गुरू नानक सभा आदिसंह अधिकारी उपस्थित होते. 0000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस