नेर येथे उद्या विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा Ø पालक न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार Ø विविध विभागांचे 60 स्टॉल Ø नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने नेर येथील तालुका क्रीडा संकुल येथे रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता ‘विधी सेवा महाशिबीर व शासकीय कल्याणकारी योजनांचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, जिल्हा प्रशासन व तालुका विधी सेवा समिती, नेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा यवतमाळच्या पालक न्यायमूर्ती मुकुलिका श्री. जवळकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी पालक न्यायमूर्ती वृषाली वि. जोशी, न्यायमूर्ती निवेदिता प्र. मेहता, तसेच न्यायमूर्ती नंदेश शं. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर च. मुनघाटे राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची उपस्थिती राहणार आहे.
या महाशिबिरामध्ये नागरिकांना मोफत विधी सहाय्य, तक्रार निवारण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिपक एच. दाभाडे तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा नेर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. सी. फुलझळके यांनी केले आहे. केले आहे.
60 स्टॉलद्वारे योजनांची माहिती
या शासकीय योजनांच्या महामेळाव्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे 60 स्टॉल उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, मतदार नोंदणी, नवीन आधार नोंदणी/दुरुस्त करणे, नवीन रेशन कार्ड मागणी, सखी वन स्टॉप सेंटर मधील सेवा, आयुष्यमान भारत योजना, संजय गांधी निराधार योजना, महसूल खातेफोड, उतारा दाखले, आर.टी. ओ.कार्यालयाच्या विविध सेवा, कृषी विभागाच्या योजना, आरोग्य तपासणी व आरोग्य सेवा सुविधा योजना, आदिवासी विभागाच्या योजना,दिव्यांग,अशा विविध योजनांचा समावेश असून याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात येणार आहे.
000000
Comments
Post a Comment