जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणीसाठी १०४ हेल्पलाईन क्रमांकावर मिळणार मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 13 (जिमाका) : जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी ही प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे. या नोंदणीबाबत नागरिकांना अचूक आणि सविस्तर माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य सल्ला केंद्रामार्फत १०४ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
या क्रमांकावर संपर्क साधल्यास नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी, नोंदणीसाठीची कालमर्यादा, प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी तसेच संबंधित कायदे व नियमांविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच नोंदणी करताना घ्यावयाची खबरदारी याबाबतही सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी संदर्भातील माहितीसाठी १०४ या हेल्पलाईन क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू डॉ. सुभाष ढोले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment