ओबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांसाठी केंद्राची ‘पीएम-यसस्वी’ योजना मॅट्रीकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : केंद्र सरकारच्या पीएम-यसस्वी या एकछत्री योजनेंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास वर्ग प्रवर्गातील अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाने लागू केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.
मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना इयत्ता ९ वी व १० वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यास दर शैक्षणिक वर्षाला रुपये ४ हजार इतका शैक्षणिक भत्ता मिळणार आहे.
तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना ओबीसी, डीएनटी तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू असून, महाआयटीच्या महाडीबीटी पोर्टलवर मॅपिंग केलेल्या अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. शुल्क निर्धारण समिती एफआरए सक्षम प्राधिकरणाने निश्चित केलेल्या शुल्कानुसार राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महा डीबीटी पोर्टलवरील निर्धारित दराप्रमाणे शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती लागू राहणार आहे.
या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित शाळा व महाविद्यालयांनी तात्काळ पडताळणी करून सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ कार्यालयात सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. एखादा विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्यास सर्वस्वी संबंधित शाळा किंवा महाविद्यालय जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment