मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा –डॉ. अशोक वुईके
यवतमाळ, दि.5 (जिमाका) : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय 2025 अन्वये मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत असून, या योजनेची राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक वुईके यांनी दिले.
डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली ४ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राळेगाव विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत समितीचे सदस्य-सचिव तथा उपविभागीय अधिकारी, राळेगाव यांनी सादरीकरणद्वारे योजनेची पार्श्वभूमी व सविस्तर कार्यपद्धती सादर केली.
यावेळी श्री. वुईके यांनी राळेगाव, कळंब, बाभुळगाव व केळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेत/पाणंद रस्ते अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेत/पाणंद रस्ते तयार करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.तसेच संबंधित तहसीलदारांना अस्तित्वात असलेले व अतिक्रमित पाणंद रस्ते याबाबतची माहिती प्रपत्र-१ व प्रपत्र-२ मध्ये भरून प्रत्येक गावात प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. सर्व गटविकास अधिकाऱ्यांना विशेष ग्रामसभा घेऊन पाणंद रस्त्याबाबत ठराव मंजूर करून घेण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले.
उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांना पाणंद रस्त्यांची मोफत मोजणी व सीमांकन करण्याबाबत, तसेच अतिक्रमण काढताना अडचण येत असल्यास मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील सर्व नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रशासन व ग्रामस्तरीय यंत्रणांनी व्यापक प्रसिद्धी करावी, असेही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीस राळेगाव, कळंब, बाभुळगाव व केळापूर तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, विविध विभागांचे उपअभियंते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
000000

Comments
Post a Comment