शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण योजना प्रस्तावित ; थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी - जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन v माहिती संकलनाचे काम सुरू

यवतमाळ, दि.9 (जिमाका) : राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने प्रस्तावित शेतकरी कर्ज निवारण योजनेसंदर्भात माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील विविध सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी आपले आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती सचिव किंवा वसुली अधिकाऱ्यांकडे द्यायवी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हान यांनी केले आहे. अनेक शेतकरी सभासदांनी अद्याप त्यांचे आधार कार्ड, बचत खाते क्रमांक आणि इतर अनुषंगीक माहिती संबंधित सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत उपलब्ध करून दिलेली नाही. माहिती संकलनाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. शेतकरी सभासदांनी तातडीने आपल्या गावातील सेवा सहकारी संस्थेचे सचिव किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील वसुली अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच आपले आधार कार्ड, बचत खाते क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत. कागदपत्रांची पूर्तता न केल्यास पुढील तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे थकीत कर्जदार सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज निवारण योजनेसाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या शाखांकडील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती विहित नमुना प्रपत्रांमध्ये संकलित केली जात आहे. यामध्ये आधार कार्ड, बचत खाते क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे थकित कर्जदार शेतकऱ्यांचा कर्ज निवारण प्रक्रियेत सहभाग होणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे सादर करून शेतकरी कर्ज निवारण योजनेत समावेश करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हान यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस