शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी गावपातळीवर विशेष मोहीम; थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी आधार कार्ड उपलब्ध करावे Ø जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन
यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : राज्यातील शेती क्षेत्रात व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनाने अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याअनुषंगाने प्रस्तावित शेतकरी कर्ज निवारण योजना 2026 संदर्भात गावपातळीवर विशेष मोहिमेद्वारे माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतू, अद्याप जिल्ह्यातील 9939 थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांची आधार कार्डची छायांकित प्रत सादर केली नसून त्यांनी ती तात्काळ कार्यकारी सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
थकीत कर्जदार सभासदांची माहिती विहित परिशिष्ट ‘अ’ मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या शाखा स्तरावर सुरू आहे. ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांचे आधार कार्ड संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेकडे उपलब्ध झालेले नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर नोंदविताना अडचणी निर्माण होत आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सचिव यांच्या माध्यमातून गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आधार कार्डच्या छायांकित प्रती संकलित केल्या जात आहेत.
आधार कार्ड उपलब्ध नसलेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या यवतमाळ 2121, कळंब 312, बाभुळगाव 373, दारव्हा 476, दिग्रस 530, आर्णी 705, नेर 585, पुसद 384, उमरखेड 1293, महागाव 907, पांढरकवडा 133, घाटंजी 860, राळेगाव 929, वणी 5, मारेगाव 68, झरी जामणी 258 अशी एकूण संख्या 9939 इतकी आहे.
या मोहिमेला शेतकरी सभासदांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी अद्याप काही शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड संबंधित संस्थांकडे जमा केलेले नाही. त्यामुळे ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी आधार कार्डची छायांकित प्रत सेवा सहकारी संस्थेचे सचिव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे निरीक्षक किंवा वसुली अधिकारी तसेच संपर्क साधणाऱ्या सहकार विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे सादर केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment