अमरावती विभागस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेत यवतमाळ आरसेटीच्या प्रशिक्षणार्थींचे यश Ø प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : दरवर्षी आरसेटी अंतर्गत प्रशिक्षित झालेल्या लाभार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य तपासण्यासोबतच आरसेटी योजनेचा व्यापक प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने उमेद अभियानाच्या माध्यमातून कौशल्य व ज्ञान स्पर्धेसारखा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतो. त्याच अनुषंगाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य कक्षामार्फत अमरावती विभाग स्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेचे आयोजन यवतमाळ आरसेटी येथे करण्यात आले. या स्पर्धेत यवतमाळ आरसेटीच्या सोनाली वाईकर यांनी फास्ट फूड या विषयात प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय क्रमांक अमरावती आरसेटीला मिळाला.
या स्पर्धेत अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ येथील आरसेटी केंद्रांमधील प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मागील दोन वर्षांत प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांमधून प्रत्येक आरसेटीमधून चार उत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यात आली होती. डेअरी फॉर्मिंग, सर्वसाधारण उद्योजकता विकास, ज्वेलरी बनविणे आणि फास्ट फूड या विषयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, यवतमाळ आरसेटीचे संचालक दीपक तिवारी, अकोला आरसेटीचे संचालक विद्याशंकर राव, अमरावती आरसेटीचे संचालक निखिल भस्मे उपस्थित होते. परीक्षक म्हणून सोमेश्वर मिटकरी, गंगाधर दाभाडे, संदीप जाधव आणि भाग्यश्री इंगळे यांनी स्पर्धकांचे परीक्षण करून प्रत्येक विषयातून दोन विजेत्यांची घोषणा केली.
फास्ट फूड या विषयात प्रथम क्रमांक सोनाली वाईकर (यवतमाळ आरसेटी) यांनी पटकाविला, तर द्वितीय क्रमांक अमरावती आरसेटीला मिळाला. ज्वेलरी बनविणे या विषयात प्रथम क्रमांक वैष्णवी पचारे यांना मिळाला, तर द्वितीय क्रमांक अमरावती आरसेटीला मिळाला. डेअरी फॉर्मिंगमध्ये प्रथम पारितोषिक अमरावती आरसेटीला मिळाले, तर द्वितीय क्रमांक यवतमाळ आरसेटीचे हेमंत चौधरी यांनी प्राप्त केला. सर्वसाधारण उद्योजकता विकास या विषयात प्रथम क्रमांक अमरावती आरसेटीला मिळाला, तर द्वितीय क्रमांक यवतमाळ आरसेटीचे आकाश राऊत यांनी मिळविला. सर्व विजेते स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
ही स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट, पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाशिम आरसेटीचे प्रशिक्षक संजय खिल्लारे, अमरावती आरसेटीचे प्रशिक्षक दीपक माहूरे, यवतमाळ आरसेटीच्या प्रशिक्षिका तेजश्री कडू तसेच किर्ती सुर्वे, रोशनी चव्हाण आणि संकेत शेंबेकर यांनी सहकार्य केले.
000000
Comments
Post a Comment