कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “ हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष
'बेस्ट ऑफ इंडिया' रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद
नवी मुंबई, दि.23( विमाका) :- हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक अभूतपूर्व इतिहास रचला गेला. कोकण विभागातील 20 हजार शाळांमधील तब्बल 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डने घेतली असून, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आगामी 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे.
नेरुळ येथील गुरु गोविंदसिंग एज्युकेशन अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील यांच्यासह उपमहापौर दशरथ भगत, विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, प्रशासन सहआयुक्त विजय म्हासाळ, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक मनोज सानप, सहायक आयुक्त डॉ.सागर घोलप, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त दिपाली दिवेकर, नवी मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोडे, तसेच गुरुबचन सिंग सिंघल, जसपाल सिंग नागरा, नगरसेवक कुलदीप सिंग सुरी, जसविंदर सिंग, मुख्याध्यापिका अमरजित कौर सेनी आणि ज्येष्ठ पत्रकार बी.पी. नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील म्हणाल्या की, श्री गुरु तेग बहादूर सिंग जी यांचे बलिदान केवळ शीख समाजासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खारघर, सेक्टर 29 येथे आयोजित होणाऱ्या या भव्य समागमात जगभरातून 15 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशा विश्वविक्रमी उपक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचे मनस्वी समाधान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या या विक्रमी सहभागाचे कौतुक करताना सांगितले की, श्री गुरु तेग बहादूर जी यांचे जीवन धैर्य, करुणा, समता आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याचा एक तेजस्वी आदर्श आहे. 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच सुरात गायलेले हे गीत सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करणारे असून, जागतिक स्तरावर याची नोंद होणे ही गौरवास्पद बाब आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी खारघर येथील सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला असून, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले. उद्याचे भविष्य या मुलांच्या हातात असून त्यांना असे संस्कारक्षम कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरतील त्यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठिक 09.00 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक गायन केले. प्रास्ताविक करताना उपसंचालक मनोज सानप यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ही मोहीम आता केवळ 'व्हिडिओ कंटेंट' न राहता एक संस्कारांची डिजिटल चळवळ बनली आहे. गुरुबचन सिंह यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत मुलांचे प्रबोधन केले. कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक संजीवनी जाधव-पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
000 000




Comments
Post a Comment