एमएसएमई उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा कर्ज मेळावा 7 फेब्रुवारीला एमआयडीसीत आयोजन
यवतमाळ, दि.6 (जिमाका) : एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाअंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ७ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी येथे विशेष एमएसएमई कर्ज उपलब्धता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय अमरावती व एमआयडीसी असोसिएशन यांच्या संयुक्त पुढाकाराने हा कार्यक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह, दारव्हा रोड, लोहारा एमआयडीसी जवळ, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक उद्योजक, सूक्ष्म व लघु उद्योग व्यावसायिक, नवीन स्टार्ट-अप्स तसेच महिला उद्योजकांना विविध एमएसएमई कर्ज योजना, व्याजदर सवलती, सूक्ष्म व लघु उद्योगांना अंतर्गत सुविधा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजनांबाबत सविस्तर माहिती देणे हा आहे.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील डिप्टी जनरल मॅनेजर हेमंत शर्मा उपस्थित राहणार असून जिल्हा उद्योग केंद्रचे महाप्रबंधक सुशील गरुड, एमआयडीसी असोसिएशन उपाध्यक्ष महेश अग्रवाल व सचिव डॉ. आनंद भुसारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी एमएसएमई कर्ज सुविधा, मुद्रा योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महिला उद्योजकांसाठी विशेष योजना, डिजिटल पेमेंट व उद्यम नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सेंट्रल बँकेच्या एमएसएमई महोत्सवांतर्गत विशेष कर्ज सुविधा, कमी व्याजदर व प्रक्रिया शुल्कात सवलती देण्यात येणार असून पात्र उद्योजकांना कार्यक्रमस्थळी प्राथमिक कर्ज मंजुरी पत्र देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्व उद्योजकांसाठी विनामूल्य असून उपस्थिती नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेशी किंवा ७५०७७७४१६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment