नेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे २२ फेब्रुवारीला आयोजन
यवतमाळ, दि.13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर व सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ फेब्रुवारी रोजी क्रीडा संकुल, नेर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मेळाव्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार भरती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कंपनी सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असून देशभरात २२ क्षेत्रीय मुख्यालये तसेच ३० शाखा कार्यालये विविध राज्यांमध्ये स्थापन आहेत. कंपनीअंतर्गत निवड झालेले उमेदवार विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत.
या भरती अभियानाअंतर्गत सुरक्षा जवान पदासाठी ३०० जागा असून किमान दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील. उमेदवारांचे वय १९ ते ४० वर्षे दरम्यान असावे. उंची किमान १६८ सेंटीमीटर व वजन ५८ ते ९० किलो असणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी ५० जागा उपलब्ध असून किमान बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील. या पदासाठी वयोगट १९ ते ४० वर्षे असून उंची किमान १७० सेंटीमीटर व वजन ५८ ते ९० किलो असणे आवश्यक आहे.
मुलाखतीचे ठिकाण क्रीडा संकुल, नेर येथे असून इच्छुक उमेदवारांनी दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे. सदर मेळावा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी दहावी व बारावी गुणपत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र, जन्मदाखला, आधारकार्डची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तसेच दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे सोबत आणावीत.
सदर भरती प्रक्रिया कंपनीच्या मानव संसाधन विभागामार्फत मुलाखत व शारीरिक चाचणीद्वारे करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ येथील सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment