भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

विजेत्यांना पारितोषिके व स्पर्धकांना मिळणार प्रशस्तीपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याचा व्यापक प्रभाव लक्षात घेता “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” या विषयावर सदर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क आदी विषयांचा समावेश या निबंधात अपेक्षित आहे. स्पर्धेचे स्वरूप : या स्पर्धेत दोन गटांचा समावेश आहे. पहिल्या गटात शासकीय व खाजगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दुसरा खुला गट असून सर्व महिला व पुरुष यामध्ये सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा आहे. निबंध मराठी भाषेत असणे अनिवार्य असून तो पूर्णपणे मूळ असावा. कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करणे आवश्यक आहे. निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्कॅन करून पीडीएफ मध्ये अपलोड करावा. नोंदणी व निबंध सादरीकरणासाठी https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंकवर निबंध सादर करण्याची मुदत दि. १४ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ अशी आहे. पारितोषिके : स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्याला रु. ३१ हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक विजेत्याला रु. २१ हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, तर तृतीय क्रमांक विजेत्याला रु. ११ हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. नोंदणी करताना स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, आयटीआय/शाळा/महाविद्यालयाचे नाव व संपूर्ण पत्ता अचूक नमूद करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर पोच उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होणार आहे. जास्तीत जास्त युवक-युवती तसेच खुल्या गटातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प. भ. जाधव यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …