डिजिटल जनगणनेत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्व-गणना अनिवार्य

 जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिपत्रक जारी  १ ते १५ मे दरम्यान ऑनलाईन सुविधा उपलब्ध जिल्ह्यात जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये घरयादी व घरगणना हे कामकाज यंदा डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी शासनामार्फत स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही स्व-गणना अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी परिपत्रक जारी केले आहे. स्व-गणनाची सुविधा दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत https://se.census.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर रीतीने भरता येणार आहे. हे पोर्टल इंग्रजी, हिंदी तसेच इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय कार्यालयांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनिवार्यपणे स्व-गणना पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिनस्त कार्यालये, संस्था व क्षेत्रीय घटकांनाही याबाबत तात्काळ मार्गदर्शन करून त्यांच्याकडूनही स्व-गणना करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी डिजिटल माध्यमे, सूचना फलक, बैठका आदींच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात येत आहे. स्व-गणना उपक्रम यशस्वी होण्यासाठी नियमित आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम राष्ट्रहिताचा असल्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विहित कालावधीत स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …